भाजपचा सोशल मीडिया तरुणाईच्या हाती…

April 4, 2014

तरुणांना आकर्षित करण्यासाठी आज सारेच पक्ष सोशल मीडियाचा वापर करीत आहेत. अर्थात तरुणांना आकर्षित करायचे असेल तर सोशल मीडियावरील भाषा, पोस्टचा विषयदेखील तरुणांना रुचणारा हवा. अन्यथा केवळ पोस्ट टाकून त्याकडे कोणी पाहणार नाही आणि अपेक्षित परिणाम साधणारा नाही. त्यामुळेच की काय, पण भाजपचा सोशल मीडिया सांभाळणारी सारी टीम या तरुणाईने व्यापलेली आहे. विनीत गोयंका या तरुणाच्या नेतृत्वाखाली देशभरात तब्बल ७२ जणांची एक भली मोठी टीम गेल्या एक वर्षांपासून यासाठी चोवीस तास काम करीत आहे. या सर्वामध्ये मुख्यत: तरुणांचा भरणा जास्त आहे. याच टीमपैकी काही जण गेल्या एक वर्षांपासून दिल्लीमध्येच वास्तव्यास आहेत. कोणी आपली नोकरी सोडून आले आहे, तर कोणी नोकरी करीत करीत या कामात आहे.
महत्त्वाचे म्हणजे हे सारे आपापल्या क्षेत्रांत तज्ज्ञ आहेत. रॉबिन हे ४२ वर्षीय तंत्रज्ञ आयटी आर्किटेक्ट असून त्यांनी २००९ च्या निवडणुकांमध्ये काम केले आहे. तंत्रज्ञानाच्या सपोर्टबरोबरच कंटेंट जनरेशनदेखील करतात. तर कल्पना रवी ही इंग्रजीत एमए केलेली स्क्रिप्ट रायटरचे काम पाहणारी तरुणी आपली नोकरी सांभाळून हे काम पाहते आहे. त्या मुख्यत: उच्च वर्गाच्या अनुषंगाने इंग्रजी मजकूर लिहितात. तसेच भाषेबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन चिकित्सक असल्यामुळे सोशल मीडियावर वापरल्या जाणाऱ्या सर्व मजकुराचे बारकाईने वाचन त्या करतात. त्यात गरजेनुसार बदलदेखील करतात. जयवंत थोरात हा डेलमध्ये नोकरी करणारा ३६ वर्षीय अभियंता. निवडणुकांच्या कामासाठी त्यांनी नोकरी सोडली आहे. देशासाठी काही काळ देता यावा यासाठी त्याने नोकरी सोडून मे २०१३ पासून तो या टीममध्ये कार्यरत आहे. डेलमध्ये ट्रेनिंग विभागात रिजनल हेड असल्यामुळे त्याला अनुभवदेखील बराच आहे. या टीममध्ये तो मराठी आणि इंग्रजीमधून कंटेंट लिहिण्याचे काम पाहतो. परेश चौधरी हा जळगावचा २६ वर्षीय तरुण मराठीतून पोस्ट करण्याचे काम करतो. पक्षाकडून आलेल्या मजकुरावर आधारित दिवसभरात २०-२५ पोस्ट तो मराठीतून करीत असतो. हिंदीमध्ये मजकूर लिहिण्याचे काम करणारे रिझवान शेख हा मूळचा मुंबईचा तरुण गेले वर्षभर दिल्लीत वास्तव्यास आहे.
मनोज जोशी, शिल्पी तिवारी असे अनेक तरुण दिल्लीतून मध्यवर्ती केंद्रातून सर्व डिजिटल मीडियावरील कंटेंट सांभाळण्याचे काम करतात. एका कॉमन ग्रुप ई-मेल आयडीच्या आधारे या सर्वाना ब्रिफ दिले जाते. त्यांनी कंटेंट लिहिल्यावर तो तपासून त्याच्या कायदेशीर पक्षीय बाजू तपासून तो ब्लास्टिंग केला जातो. ब्लास्टिंग म्हणजे एकाच वेळी मोठय़ा संख्येत ई-मेलवर मजकूर पाठवणे. यासाठी आजअखेर तब्बल १७००० तरुणांचा सहभाग आहे. या माध्यमातून एकदा पोस्ट केलेला मजकूर पुढे हजारो जणांपर्यंत नेणारे कार्यकर्ते असंख्य आहेत. राज्याच्या पातळीवरच बोलायचे झाले तर आज भाजपकडे पाच हजार कार्यकर्त्यांची टीम आहे. पक्षाकडून येणारा मजकूर सर्वदूर पसरविणे ही त्यांची जबाबदारी आहे. – See more at: http://www.loksatta.com/lokprabha/elections-and-youth-2-422525/#sthash.PrqIZNAN.dpuf